मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

१८५७ पूर्वी चे खान्देशातील आदिवासींचे उठाव

खान्देशातील आदिवासी क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्ययुध्दात दिलेल्या आहुत्या -




३ जून १८१८ रोजी दुसऱ्या बाजीराव पेशवा खान्देशातील अशीरगड नजीक धूळकोट येथे इंग्रज अधिकारी जॉन माल्कम याला शरण गेेला , इंग्रज-मराठा युद्ध संपुष्टात येऊन संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजी सत्तेचे बीजारोपण झाला. तसेच ऑगस्ट १८४८ मध्ये लॉर्ड डलहौसीने साताऱ्याची गादी खालसा करून महाराष्ट्रात पूर्ण स्वरूपात ब्रिटिश राजवट प्रस्थापित केली .

सत्ता स्थापन करीत असताना ब्रिटिशांनी ठग , पेंढारी , गारदी यांचा बंदोबस्त केला , केंद्र असणारे गड कोट-किल्ले ताब्यात घेतले. शिक्षण , न्याय , कायदा , समाजकारण, अर्थकारण यात हस्तक्षेप करून काही नवीन व्यवस्था सुरू केल्या. एकीकडे सुधारणा तर दुसरीकडे पारतंत्र्य व शोषणास सुरवात केली. संपूर्ण देशात जी स्थिती होती तीच महाराष्ट्रात खान्देशातही होती. त्यामुळे ब्रिटिशांच्या धोरणांविरोधी प्रतिक्रिया ज्या पद्धतीने भारतात उमटल्या तशाच प्रतिक्रिया महाराष्ट्रतही उमटल्या आहेत. नवं सुशिक्षित वर्ग ब्रिटिश सत्तेचे साम्राज्यवादी स्वरूप वृत्तपत्रे , शिक्षण-संस्था यांद्वारे जनतेसमोर आणून राष्ट्रवादाचा पाया मजबूत करण्याच्या प्रयत्न करत होता . दुसरीकडे परकीय ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणांविरुद्ध महाराष्ट्रातील भिल्ल , रामोशी , कोळी , कोकणी इ. आदिवासी जमातींकडून तसेच संस्थानिकांकडून आणि वैयक्तिक स्वरूपात उठाव १८५७ पूर्वी घडून आले . 

महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य उठावाची पहिली ठिणगी भिल्लवीरांनीच खान्देश मध्ये पेटवली. इ स १८१८ ते १८७० पर्यंत विविध ठिकाणी उठाव झाले .

महाराष्ट्रत पूर्व व पश्चिम खान्देश तसेच नाशिक जिल्ह्यातील बागलाण , पेठ , सुरगाणा व इगतपुरी येथे भागात आदिवासींची संख्या जास्त आहे . इ स १८१८ मध्ये खान्देश व बागलाण भागात जवळपास ५५,००० भिल्ल लोक राहत होते. राज्यातील अस्तिर राजकीय स्थितीचा या आदिवासींवर परिणाम होत असे. या सतत वारंवार होणाऱ्या लढायांमुळे खान्देशातील भिल्ल जमातीने डोंगरात आश्रय घेतला . आपल्या वस्तीभोवती तटबंदी करून जमातीच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली ते राहत असत.

इंग्रजांनी खान्देशावर वर्चस्व निर्माण केल्यानंतर , इ.स. १८१९ मध्ये माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने मुंबई प्रांताची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर कलेक्टर म्हणून खान्देशची जबाबदारी कॅप्टन जॉन ब्रिग्ज यांच्याकडे सोपवली होती. इंग्रजांनी आपल्या आर्थिक लाभासाठी स्थानिक आदिवासींचे हक्क हिरावून घेतले , त्यांच्याकडील वतने व जमिनीवरील हक्कांवर गदा आणली. सावकारांना कंपनी सरकारने प्रोत्साहित करून आदिवासींचे आर्थिक शोषण सुरु केले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीही त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती केली. यामुळे इंग्रज राजवटीबद्दल आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला. 

इंग्रजाच्या जुलमी कारभाराविरुद्ध खान्देशातील आदिवासी वीर पेटून उठले. सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरात राहणारे आदिवासी भिल्ल क्रांतिकारक याच काळात एकत्र आले. त्यांचे नेतृत्व ३२ आदिवासी भिल्ल वीरांनी स्विकारले . यात प्रामुख्याने कन्हैय्या , चिल्या , जीवा , रामसिंग , वसावा उमेडसिंग , कुंवरसिंग , काझीसिंग (खाज्या नाईक) , भीमा नाईक , भागोजी नाईक, सुभान्या , हिऱ्या , रामजी , कान्या , देवचंद , संभाजी , दशरथ यांच्यासारख्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी बलिदान दिले.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींना ठाण्याच्या तुरूंगातून पलायन केलेले बाजीरावाचे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांनी चिथवले व गुलामीत टाकणाऱ्या फिरंग्यांचे मुडदे पाडण्याचे आदेश त्याने भिल्लवीरांना देऊन उठावाची सूत्रे गोदाजी डेंगळे आणि महिपा डेंगळे या आपल्या पुतण्यांकडे दिली.

३० जानेवारी १८१८ ला नांदगाव, नाशिक भागात भिल्ल व कोळी वीरांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ले केले . यात १० इंग्रज सैनिक ठार , तर ५० जखमी झाले. १८१८ या उठावात नाशिक व चाळीसगाव जवळच्या सुमारे ८००० भिल्लवीरांनी भाग घेतला होता. ठिकठिकाणी उठाव करून इंग्रज प्रशासनास जेरीस आणले. भिल्लांचा हा उठाव ब्रिटिशांपुढे आणि त्यांच्या कायदा सुव्यवस्थेपुढे आव्हान होते. खान्देशचे तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जकडे या मोहिमेचे नेतृत्व होते. त्याने घाटवाटांवर सैन्य ठेवून रसद बंद केली व अनेक पुढाऱ्यांना ठार मारले .

रावेर (जळगाव) इथं १८१८ मध्ये भिल्लांनी उठाव केला. तो उठाव कन्हैय्या भिल्ल आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. इंग्रजांच्या रिपोर्टवरून कन्हैय्याच्या हाताखाली १५ भिल्ल नायकांच्या टोळ्या काम करीत होत्या असे समजते. त्यांच्याकडे ९१ घोडे आणि सुमारे १ हजार भिल्लांचे लष्कर होते. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांनी भिल्लांचेच लष्कर तयार केले. त्या भागातील व्यापा-यांचे आणि रयतेचे रक्षण करण्यासाठी भिल्ल नायकांना वेतनही दिले . पण याचा फारसा उपयोग झाला नाही. १८१९ ला भिल्लांनी सर्व बाजूंनी उठाव केला. या उठावाचे वैशिष्टय़ म्हणजे खान्देशातील पाटलांनी यात भाग घेऊन भिल्लांना मदत केली होती .

इंग्रजांनी भिल्लांचा उठाव मोडून काढण्यासाठी साम , दाम , दंड , भेद , नीतीचा अवलंब केला. वेळप्रसंगी त्यांना आमिषे दाखवली. त्यांच्या उपजीविकेची तजवीज केली. त्यांचीच स्वतंत्र पलटण उभारून त्याचंच विरोधात उभी केली. तरीही भिल्लांनी आपल्या नायकांच्या नेतृत्वाखाली बंड सुरूच ठेवले. एक नायकास अटक करत तेथे दुसरा नायक नेतृत्व करून इंग्रजांचे ठाणे जिंकून घेई .

पुढे गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एलफिन्स्टनने भिल्लांबाबत औदार्याचे धोरण स्विकारले. भिल्लांना वेतन देऊन घाटातील वाटसरूंच्या रक्षणाची जबाबदारी भिल्लांवर सोपविली व त्यांना प्रवाहात सामावून घेण्याचा प्रयत्न केला . काही काळाच्या शांततेनंतर भिल्लांनी पुन्हा उठावाचे धोरण स्विकारले. परिणामी पुन्हा इंग्रज-भिल्ल संघर्षाला सुरुवात झाली .

१८१९-२० च्या दरम्यान चिल्या नाईकने उठाव केला पण त्यास इंग्रजांनी पकडून फासावर लटकवले. पण भिल्ल काही शांत बसले नाही त्यांनी लुटालूट सुरु केली. १८२० ला सरदार दशरथने उठाव केला. त्यास धनाजी , हसरत , पेंढारी नेता शेख अब्दुल्ला येऊन मिळाले. त्यांनी खान्देशातील सातपुडा परिसरात धुमाकूळ घातला. परंतु कॅप्टन ब्रिग्ज , मेजर मोरीन यांच्या आक्रमणापुढे त्यांना शरणागती पत्करावा लागला .

१८२२ मध्ये हरिया ( हिऱ्या नाईक )नावाच्या प्रसिद्ध भिल्लवीराने पुन्हा एकदा उठाव करून इंग्रजांना आव्हान दिले. त्यांचा नेतृत्वाखाली आदिवासी भिल्लवीरांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी खानदेशातील ब्रिटिश शासन जवळ जवळ संपविलेच होते. १८२३ मध्ये या वीरांना दडपण्यासाठी इंग्रज अधिकारी कर्नल रॉबिन्सन सेना घेऊन खान्देशात आला. १८२४ ला लिव्हिंगटन या इंग्रज अधिकाऱ्यांने भिल्लांची ३५ घरे , ४ पुरुष व २ महिलांना स्त्रियांना अमानुषपणे जाळले. कर्नल रॉबिन्सन ला दोन वर्षे शर्तीचे प्रयत्न करून शेवटी भिल्लांचा उठावावर मात करण्यात यश मिळाले .

कंपनी सरकारने अनेक कठोर उपाय योजुनही भिल्लांचा उठाव सुरुच राहिला .

१८२५ ला बागलाण (सटाणा) परिसरात शिवराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली ८०० आदिवासींनी उठाव केला. इंग्रजांकडील अंतापूरवर हल्ला करून मुल्हेर किल्ला ताब्यात घेतला. इंग्रजांनी लेफ्टनंट ऑट्रमनला सेवारामाच्या बंदोबस्तासाठी पाठविले होते. त्यांनी शिवराम आणि काही प्रमुख भिल्लांना पकडले व त्यांना शिक्षा न देता त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे इतर भागात अजून उठाव सुरुच होते .

१८२६ ला डांग भागातील स्वातंत्र्यवीर लोहारा भिल यांनी इंग्रजांना आव्हान दिले. खान्देशातील काही देशमुख, पाटील मंडळींनी ही भिल्लांना मदत केली होती. हाही उठाव इंग्रजांनी मोडून काढला .

१८३० च्या सुमारास खान्देशाच्या उत्तरपूर्वेकडील भागात तडवी मुसलमान व भिल्लांनी उठाव केला तेव्हा लेफ्टनंट औट्रॅमने यावलकडे येऊन ४३९ भिल्ल बंडखोरांना पकडले. त्यापैकी १६८ तडवी व पारध्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली होती .

एकंदरीत १८१८ ते १८३१ या काळात नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, नाशिक व डांग भागातील ९ ते १० हजार आदिवासींनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केल्याचे गव्हर्नर एल्फिन्स्टनने अहवालात नमूद केले आहे. इ.स. १८३६ ला तर अहमदनगर जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी पिंपळनेर (साक्री, धुळे) येथे बागलाण मार्गे येऊन तिथल्या सरकारी कचेरीवर हल्ला करून तेथील रोख रक्कम लुटून ब्रिटिश सत्तेला जबरदस्त हादरा दिला होता .

इ.स. १८३९ मध्ये खानदेशात तडवी भिल्लांनी उठाव केला होता. १८४० ला डांग भागातील उठावकर्त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील गावावर हल्ला करून ती गावे लुटली होती. तर १८४१ ला सुलतानपूर परगण्यातील शहादा परिसरातील भामन्या नाईक याने आव्हान दिले. त्यात झालेल्या संघर्षात भामन्या नाईक शहीद झाला. १८४२ ला पश्चिम खान्देशातील सावदा-फैजपूर परिसरातील भिल्ल , तडवींनी भिकाराया आणि बागचंदच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन तेथील बाजारपेठांवर हल्ला केला. ही बातमी कंपनी सरकारच्या सेनेला कळताच त्यांनी बंडखोरांचे दमन केले , तसेच जंगली उत्पादनांवर कुणाची मालकी असावी या मुद्दयावर इ.स. १८४६ मध्ये चिखली गावचे प्रमुख जीवा वसावा यांनी इंग्रजांशी संघर्ष सुरू केला. हा आदिवासींच्या परंपरागत हक्कांसाठी हा संघर्ष होता. या उठावात जीवा वसावा यांच्या सोबत डांगचा राया नाईक व कुंवर वसावा यांनी या उठावाची सूत्रं हाती घेऊन इंग्रजांशी संघर्ष केला. यात जीवा वसावा यांना इंग्रजांनी पकडुन  प्रदीर्घ कारावासाची शिक्षा दिली .  

आदिवासी नेत्यांचा इतिहास आजच्या पिढीला माहीत व्हावे म्हणूनच हा लेख लिहिला गेला आहे बिरसा मुंडा , भीमा नाईक , शिवराम , जीवा वसावा व कोमराम भीम यांच्यासारखे असंख्य आदिवासी नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठे काम केले आहे , मात्र त्यांचा इतिहास अजून समोर आलेला नाही . तेव्हा आपण सर्वांनी ते पुढे आणले पाहिजे .

पुढच्या भागात आपण खान्देशातील आदिवासींच्या १८५७ च्या उठावातील योगदानाबद्दल माहिती घेऊ ....!



साभार - 1) महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे
            2)आदिवासींचे उठाव  (डॉ .सर्जेराव भामरे )

1 टिप्पणी: